श्रीक्षेत्र थेऊर येथे ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० हून अधिक नागरिक लाभार्थी

Facebook
Twitter
WhatsApp

 

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर प्रतिनिधी 

 

थेऊर (ता. हवेली) – महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. थेऊरफाटा–थेऊर रोडवरील आशिर्वाद बॅन्क्वेट हॉल येथे पार पडलेल्या या शिबिरात १००० पेक्षा अधिक नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.

या उपक्रमाचे आयोजन पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. विविध विभागांना एकत्र आणून नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली सोडविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे नागरिकांनी व्यक्त केले. शेतकरी, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. थेऊर, कोलवडी, साष्टे, कुंजीरवाडी व मांजरी बु. या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

शिबिरात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, समाज कल्याण, वन विभाग आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, सातबारा उतारे, फेरफार, वारस नोंद, ई-मोजणी, तुकडेबंदी नियमितीकरण, पीएम किसान, नमो किसान, संजय गांधी निराधार व दिव्यांग योजना तसेच ग्रामपंचायत करसंबंधित अर्ज मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यात आले. अनेक प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला असून काही लाभार्थींना प्रतीकात्मक स्वरूपात दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

 

कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, अतिरिक्त गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, सुरेखा हरगुडे, संदेश आव्हाळे, दिलीप वाल्हेकर, उपसभापती विद्याताई गायकवाड तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानामुळे शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत जलद गतीने पोहोचत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags