
पंचायत समिती सदस्य कुशल सातव यांची घटनास्थळी धाव.
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
वाडेगाव येथील इंगळे मळा परिसरात शेतजमिनीवरून गेलेल्या तुटलेल्या व खाली लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेमुळे रविवारी सकाळी गंभीर अपघात घडला. या घटनेत शेतकरी जालिंदर निवृत्ती इंगळे यांची एक शेळी विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडली, तर शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या १६ वर्षीय मुलाला देखील विजेचा धक्का बसला. मात्र, प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली. ही घटना समजताच पंचायत समिती सदस्य कुशल सातव यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली.
स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी शेताच्या बांधावरून गेलेली विजेची तार सुमारे वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत खाली लोंबत होती. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित वायरमनला माहिती दिली होती. काही महिन्यांपूर्वी परिसरातील रोहित्र जळाल्यानंतर दुरुस्तीसाठी आलेल्या वायरमनला शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ही तुटलेली तार दाखवूनही दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या अगोदरच पंचायत समिती सदस्य कुशाल सातव यांनी दिनांक १२ मे २०२६ रोजी उपकार्यकारी अभियंता, महावितरण उरुळी कांचन यांच्याकडे लेखी तक्रार करून रोहित्र, फ्युज बॉक्स आणि तुटलेल्या तारा यांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने आजचा अपघात घडल्याचा आरोप कुशल सातव यांनी केला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शेतकरी जालिंदर इंगळे यांनी आपल्या शेळ्या शेतात चरण्यासाठी सोडल्या असता तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून शेळीला सोडवण्यासाठी गेलेला ऋषिकेश जालिंदर इंगळे (वय १६) याच्या हातालाही विजेचा धक्का बसला. मात्र, त्याने प्रसंगावधान राखून तात्काळ हात मागे घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य कुशल नाना सातव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून परिसरातील अशा धोकादायक तारा व विद्युत यंत्रणांची तपासणी करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
“मागील वर्षभरापासून तुटलेल्या तारेबाबत शेतकऱ्यांनी वारंवार माहिती दिली होती. संबंधित वायरमनने वेळेत दुरुस्ती केली असती तर आजचा अपघात टळला असता,” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत महावितरण वरिष्ठ अधिकारी वाईकर यांना विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी “मी आमच्या वायरमनकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करतो,” अशी प्रतिक्रिया दिली.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, महावितरणने सर्व भागातील धोकादायक विद्युत तारा, रोहित्र व यंत्रणांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे ज्या वायरमन ला या तुटलेल्या तारेबद्दल सांगून सुद्धा वेळेत काम न केल्यामुळे त्याच्यावरही निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. महावितरण याकडे काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.










