
स्कॉर्पिओ अंगावर घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न; लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे, दि. २५एप्रिल २०२६ :
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील साष्ठे-कोलवडी परिसरात शेतजमिनीच्या वादातून तणाव निर्माण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. जमीन व्यवहाराच्या वादातून काही व्यक्तींनी विळ्याने हल्ला करण्याचा तसेच वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी रोहित शिवाजी मोडक यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात अर्ज देत हनुमंत साळुंखे, योगेश साळुंखे, त्यांचा नातू, त्यांचे जावई जगताप, त्यांचा मुलगा तसेच इतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित शेतजमिनीचा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेद्वारे करण्यात आला होता. जमीन खरेदीपूर्वी सुमारे ५० वर्षांपूर्वीचा टायटल सर्च रिपोर्ट वकिलामार्फत तपासण्यात आला होता. त्यानंतर संबंधितांना रितसर नोटीस देऊन कायदेशीर खरेदीखत करण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी ते साष्ठे-कोलवडी येथील शेतजमिनीवर गेले असता हनुमंत साळुंखे यांचा मुलगा योगेश साळुंखे, त्यांचा नातू, जावई जगताप व त्यांचा मुलगा हे त्या ठिकाणी आले. त्यांनी तक्रारदारास धक्काबुक्की करत “ही जागा आमची आहे”, “याआधी दोघांचे डोके फोडले आहे”, “आता तुझे कायमचे फोडून तुला बांधून विहिरीत टाकून देईन” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.










