झोपलेल्या कामगाराला कारने चिरडले; पोलिसांची दिशाभूल करण्याचा चालकाचा प्रयत्न!

Facebook
Twitter
WhatsApp

सीसीटीव्हीने उघड केले अपघाताचे वास्तव; बाणेर पोलिसांकडून चालकाचा शोध

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

पुणे : बालेवाडी परिसरातील ममता चौकात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराच्या अंगावर कार गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेताना चालकाने पोलिसांना वेगळीच माहिती दिल्याचे तपासात समोर आले. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कारच्या मार्गाचा माग काढल्यानंतर अपघाताचे खरे ठिकाण शोधून काढले.

ही घटना शुक्रवारी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास बालेवाडीतील ममता चौक परिसरात घडली. मृत व्यक्तीचे नाव बाबा बाबुराव चव्हाण (वय 54, रा. कात्रज) असे आहे. चव्हाण हे रोजंदारीवर काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कारचालक डावीकडे वळण घेत असताना त्याच्या कारजवळून दुसरे वाहन गेले. त्या वाहनाची धडक टाळण्यासाठी त्याने कार अचानक डावीकडे घेतली. याचवेळी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या चव्हाण यांच्या अंगावर कार गेली.

जखमीला रुग्णालयात नेले; मात्र पोलिसांना दिली वेगळी माहिती

अपघातानंतर चालकाने गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना कारमध्ये घेतले. बाणेर रोडवर त्याला पोलिसांचे गस्ती पथक भेटले. मात्र त्याने पोलिसांना, चव्हाण रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने उपचारासाठी घेऊन जात असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्यानंतर चव्हाण यांना औंध येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांना संशय; CCTV तपासताच सत्य समोर

बाणेर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर चालकाने चव्हाण आपल्याला ज्या ठिकाणी सापडल्याचे सांगितले होते, त्या माहितीची पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी कार कोणत्या मार्गाने आली होती याचा माग काढला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

या तपासात ममता चौक परिसरातील प्रत्यक्ष अपघाताचे ठिकाण आणि अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले, अशी माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी माध्यमांना दिली.

बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

या प्रकरणात बाणेर पोलिसांनी संबंधित कारचालकाविरुद्ध बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका कामगाराचा अपघातात जीव गेल्यानंतर चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीतील विसंगती सीसीटीव्हीमुळे उघड झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags