उरुळी कांचन (ता. हवेली) हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व प्रगतशील गाव. सामाजिक आणि राजकीय चळवळींच्या पाऊलखुणा या गावाच्या मातीत खोलवर रुजलेल्या आहेत. या गावाच्या जडणघडणीत बडेकर कुटुंबाचे योगदान विशेष ठरते.
चळवळीतून राजकारणापर्यंतचा प्रवास
आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते बाळासाहेब बडेकर यांनी गावोगाव फिरून बहुजन समाजाला संघटित केले. शोषित-वंचितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठवला. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन बडेकर कुटुंबाने शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा मार्ग स्वीकारला.
याच विचारधारेतून गावात त्यांचे राजकारण उभे राहिले. कालांतराने या कुटुंबातील सदस्य गावच्या नेतृत्वाच्या विविध पदांवर विराजमान होत गेले. आणि आज त्या परंपरेचा एक नवा टप्पा सायली बडेकर यांच्या उपसरपंचपदी निवडीमुळे गाठला आहे.
दुर्मिळ योग
गावकऱ्यांच्या दृष्टीने हा क्षण अभिमानाचा आहे. कारण बडेकर कुटुंबाने एक दुर्मिळ योग साधला आहे
सासरे दिवंगत बाळासाहेब बडेकर सरपंच
सासूबाई हेमलता बडेकर पंचायत समिती उपसभापती
पती जितेंद्र बडेकर-उपसरपंच
व स्वतः: सायली बडेकर या उपसरपंच
एकाच कुटुंबातील प्रतिनिधी गावच्या लोकशाही नेतृत्वात कार्यरत असणे, ही घटना अत्यंत दुर्मीळ ठरते.
गावच्या विकासासाठी नवे पाऊल
सायली बडेकर यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात महिलांचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे. त्यांचा सहभाग गावातील सामाजिक समता, शिक्षण आणि विकासाच्या उपक्रमांना नवा वेग देईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमध्ये आहे.
आंबेडकरी विचारांना न्याय
या निवडीमुळे फक्त एका कुटुंबाचा गौरव झालेला नाही, तर आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना नागरीकांमध्ये झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांचा वारसा बडेकर कुटुंबाने कृतीत उतरवला आहे. त्यांच्या कार्यातून गावातील लोकशाही जीवनात आंबेडकरी विचार अधिक दृढ होत आहेत.