गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाची आत्महत्या; नर्तकीवरील आरोपामुळे राज्यभर चर्चेला उधाण

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
गेवराई (बीड) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) यांनी कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या संबंधांमुळे निर्माण झालेल्या तणावातून बार्शी तालुक्यातील सासुरे गावात स्वतःच्या कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, पूजा गायकवाड या नर्तकीचं नाव चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर तिच्यावर आरोपांची झोड उठवली जात आहे.
नर्तकीवर अन्यायकारक आरोप?
कला केंद्रं शासनाच्या परवानगीने चालतात. येथे येणाऱ्या महिला नर्तकी प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. त्या कुणाच्याही घरात जाऊन नाच करत नाहीत. प्रेक्षक स्वतःहून या ठिकाणी जातात आणि त्यातून संवाद, चॅटिंग किंवा भेटीगाठी घडतात. या प्रक्रियेत कुणाचीही बळजबरी नसते. त्यामुळे “फक्त महिला नर्तकीलाच जबाबदार ठरवणं चुकीचं आहे,” असं अनेकांचं मत आहे.
बर्गे यांची जबाबदारीही तितकीच
गोविंद बर्गे हे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. गावातील लोकप्रतिनिधी म्हणून उपसरपंच पद भूषवताना त्यांनीच आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. कुटुंबासाठी कमावलेला पैसा बाहेर खर्च केला. या सर्व प्रकाराला फक्त पूजा गायकवाड जबाबदार ठरवून तिची बदनामी करण्याऐवजी, बर्गे यांची स्वतःची गैरजबाबदारी आणि चुकीचे निर्णयही कारणीभूत असल्याचं नागरिक सांगत आहेत.
कला केंद्रांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या प्रकरणानंतर कला केंद्रांचा कारभार तपासण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. अनेक ठिकाणी या केंद्रांत दारू पिणे, व्यसन, पैशांची उधळपट्टी आणि अवैध संबंध अशा गोष्टी घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनाने या ठिकाणांवर लक्ष ठेवून काटेकोर तपास करावा, अशी मागणी होत आहे.
डान्सबार बंदीचा संदर्भ
दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले होते, कारण अशा ठिकाणांमुळे असंख्य कुटुंबं उद्ध्वस्त होत होती. आज कला केंद्रांच्या नावाखाली पुन्हा त्याच प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
👉 ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून, महिला नर्तकींवर एकतर्फी दोषारोप करणे की पुरुषांच्या गैरजबाबदारीला जबाबदार धरणे, या दोन दृष्टिकोनातून मोठं सामाजिक वादंग उभं राहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags