साखर कारखाना कामगाराची मुलगी ते जिल्हा परिषद सदस्य संघर्ष, शिक्षकी सेवेतील संवेदनशीलता आणि समाजकार्यातून घडलेला सौ. शीतल सुजित कांबळे यांचा प्रेरणादायी प्रवास

Facebook
Twitter
WhatsApp

 

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

थेऊर / लो णी काळभोर (प्रतिनिधी):

सामान्य कुटुंबातून येत जिद्द, परिश्रम आणि समाजाभिमुख कार्याच्या बळावर जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत मजल मारणाऱ्या सौ. शीतल सुजित कांबळे यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या साहेबराव भाऊराव वाघ यांची कन्या असलेल्या शीतलताईंचे बालपण साखर कारखाना कॉलनीतच गेले. चिंतामणी विद्या मंदिर, थेऊर येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण लग्नानंतर पूर्ण करत डी.एड. पदवी संपादन केली आणि तब्बल ११ वर्षे आदर्श शिक्षिका म्हणून सेवा बजावली.

शिक्षकी पेशात कार्यरत असताना त्यांनी केवळ अध्यापन न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीवर भर दिला. “विद्यार्थी हेच देशाचे भविष्य” या विश्वासाने त्यांनी संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य केले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मर्यादित साधनांमध्ये आर्थिक नियोजन कसे करावे, दैनंदिन जीवनातील अडचणींना कसे सामोरे जावे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या समस्या कशा सोडवाव्यात—याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

लोणी काळभोर ते कात्रज असा दररोजचा बस प्रवास करताना त्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या जवळून अनुभवल्या. वाहतूक कोंडी, वेळेची अनिश्चितता, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, प्रवासातील गैरसोयी आणि दैनंदिन संघर्ष—या सर्वांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. याच अनुभवांमुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता अधिक दृढ झाली आणि समाजकार्यात सक्रिय सहभाग वाढत गेला.

घरातील सामाजिक कार्याचा वारसा देखील त्यांना प्रेरणादायी ठरला. वडील साहेबराव वाघ, आजोबा भाऊराव वाघ आणि बंधू श्रीनिवास वाघ हेही सामाजिक कार्यात सक्रिय राहिले असून, श्रीनिवास वाघ अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात कार्यरत आहेत. जनसंपर्क, संघटनात्मक बांधणी आणि विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी जनतेशी मजबूत नाळ निर्माण केली आहे. या कुटुंबीय परंपरेमुळेच शीतलताईंची समाजासाठी काम करण्याची जिद्द अधिक बळकट झाली.

त्यांचे पती सुजित कांबळे हे वकिली करतात.लोणी काळभोर परिसरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते असून, दोघांनी मिळून सर्वसामान्यांच्या न्यायासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत २०२६ मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषद लोणी काळभोर गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या कार्याची दखल घेऊनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी जाहीर केली. शितलताईंनी केलेले कार्य व त्याला सर्व मतदार बंधूंनी दिलेली साथ पक्षाचा पाठिंबा या जोरावर त्यांनी जवळपास पाच हजार मतांच्या फरकाने दैदिप्यमान विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला.

एका साखर कारखाना कामगाराची मुलगी जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत पोहोचल्याने हा विजय सर्वसामान्यांच्या संघर्षाचा सन्मान मानला जात आहे. थेऊर गावची कन्या लोणी काळभोर गटाची लोकप्रतिनिधी झाल्याने संपूर्ण परिसरातून त्यांच्या निवडीचे उत्स्फूर्त स्वागत होत असून, आगामी काळात त्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, असा ठाम आशावाद नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags