
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर पंचायत समिती गणातील पारंपरिक निवडणूक गणित मोडीत; विकासकामांवर जनतेचा ठाम कौल
थेऊर : थेऊर पंचायत समिती गणामध्ये गेल्या पाच निवडणुकांपासून अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत होती. या गणात साधारणतः शंभर मतांच्या आत निकाल लागत असल्याची परंपरा होती. मात्र यंदा हे सर्व गणित पूर्णपणे बदलले असून युवराजनाना काकडे यांनी तब्बल पाच हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत इतिहास घडवला आहे.
युवराजनाना काकडे हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असले तरी परिसरात त्यांची खरी ओळख “आरोग्यदूत” अशी निर्माण झाली आहे. गरजू रुग्णांना शासकीय योजनांतून मदत मिळवून देणे, आवश्यकतेनुसार स्वखर्चातून हॉस्पिटलचा खर्च उचलणे, तसेच वंचित घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे अशी अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी सातत्याने केली आहेत.
मागील काळात थेऊर गावातील सर्व वस्त्यांमध्ये स्वखर्चातून वीज सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. विविध विकास योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे मंजूर करून घेणे आणि ती दर्जेदार पद्धतीने पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. थेऊर-नायगाव शिवरस्ता तसेच काकडे मळा-थेऊरगाव रस्ता यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी त्यांनी अनेकदा मुंबई मंत्रालय येथे पाठपुरावा केला. यामुळे त्यांच्या विकासनिष्ठेची प्रचिती नागरिकांना आली.
शेतामध्ये बिबट्या आढळला, पूरस्थिती निर्माण झाली, डीपी जळाली, महसूल कार्यालयातील काम अडले—अशा प्रत्येक प्रसंगी “नानांना फोन” हा नागरिकांचा स्वाभाविक प्रतिसाद झाला होता. स्थानिक प्रश्न असो किंवा वैयक्तिक अडचण, युवराज नाना काकडे यांच्या हस्तक्षेपाशिवाय मार्ग निघत नाही, अशी जनमानसात ठाम भावना निर्माण झाली होती. या सर्व कामाचेच चीज म्हणून नागरिकांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले.
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत एवढ्या मोठ्या मताधिक्याची कल्पना विरोधकांनाच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही नव्हती. थेऊरबरोबरच कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी या गावांमधील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याने हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. स्थानिक रस्ते, मूलभूत सुविधा आणि वैयक्तिक मदतीच्या माध्यमातून जनतेशी निर्माण झालेला विश्वास या विजयामागे निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दणदणीत विजयामुळे थेऊर पंचायत समिती गणातील राजकीय समीकरणे बदलली असून, पुढील काळात परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.










