
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर : अनेक सापांना जीवदान देणाऱ्या आणि नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या थेऊर येथील तरुण सर्पमित्राचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दीपक संतोष जाधव (वय 21) असे मृत तरुणाचे नाव असून त्यांच्या निधनाने थेऊर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दीपक जाधव हा परिसरात सक्रिय सर्पमित्र म्हणून ओळखला जात होता. घरात, शेतात किंवा वस्त्यांमध्ये साप आढळल्यास नागरिक त्याला संपर्क करत असत. कोणतीही भीती न बाळगता तो तत्काळ घटनास्थळी पोहोचून सापांना सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडत असे. त्याच्या या सामाजिक कार्यामुळे त्याने अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला होता.
सोमवारी (दि. 25) सायंकाळी कोलवडी परिसरात साप निघाल्याची माहिती दीपकला मिळाली. त्यानंतर तो साप पकडण्यासाठी तेथे गेला. सापाचा शोध घेत असताना एका पत्र्याखाली साप लपल्याचा संशय आल्याने त्याने हात घातला. यावेळी दबा धरून बसलेल्या विषारी सापाने त्याच्या हाताला दंश केला.
घटनेनंतर स्थानिक नागरिक व मित्रांनी दीपकला तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अत्यंत मनमिळावू स्वभाव आणि धाडसी वृत्तीमुळे दीपक जाधव यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अचानक जाण्याने थेऊर, कोलवडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.










