उरुळी कांचनमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट! पोलिसांची डोळेझाक, नागरिक त्रस्त – प्रशासन गप्प का?

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

उरुळी कांचन (ता. हवेली) :

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. गावाच्या मध्यवस्तीमध्ये उघडपणे मटका, पणती, पाकोळी व सुरत यांसारखे जुगारांचे धंदे सुरू असून, नागरिकांच्या तक्रारी, बातम्यांचे वृत्तांकन, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ – या सगळ्यानंतरसुद्धा पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळेच “उरुळी कांचनमध्ये पोलीसच अवैध धंद्यांचे संरक्षक तर नाहीत ना?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

माजी एसपी पंकज देशमुख यांच्या काळात होते 100% बंद

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे माजी अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांच्या कार्यकाळात उरुळी कांचनसह ग्रामीण भागातले सर्वच अवैध धंदे शंभर टक्के बंद झाले होते. स्थानिकांनी त्यांचा कार्यकाळ सुवर्णकाळ मानला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा या धंद्यांनी डोके वर काढले आहे.

गावाच्या मध्यवस्तीमध्ये उघडपणे धंदे

महात्मा गांधींच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन गावात आज मात्र मटक्याचा पत्ता टाकला जातो, सुरतीच्या पत्त्यांची गडगडाट चालते आणि पोलीस मात्र गप्प बसलेले दिसतात.

बाजार तळालगत एका संस्थेच्या कार्यालयामध्ये मटका-सोरट धंदा सुरू.

संजीवनी हॉस्पिटल समोरील गल्लीमध्ये खुलेआम पत्ते टाकले जातात.

पूनावाला शाळेजवळच्या पुलाजवळ, म्हणजेच शाळेपासून अगदी हाकेच्या अंतरावर, रोजच्या रोज जुगाराचा खेळ रंगतो.

हे सगळे प्रकार गावातील सर्वसामान्य नागरिकांना दिसतात, मात्र पोलीस मात्र आंधळे झाल्यासारखे वागत आहेत.

पत्रकार व्हिडिओ व्हायरल, तरी कारवाई शून्य!

नुकताच एक तथाकथित पत्रकार अवैध धंदेवाल्यांकडून पैसे घेताना व्हिडिओत सापडला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी अपेक्षा केली होती की, पोलीस मोठी धडक कारवाई करतील. मात्र, दुसऱ्याच दिवशी तेच अवैध धंदे त्याच जोमानं सुरू झाल्याचे चित्र दिसले. यावरून या धंद्यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय बळावतो आहे.

नागरिकांचा संताप – गावाची बदनामी सुरू

गावातील नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे –

“पोलिसांना सगळं माहीत असूनही ते गप्प का?”

“मटका-सोरटच्या पैशातून कुणाचा हिस्सा वरवर जातो का?”

“शाळेजवळ, रुग्णालयाजवळ, बाजारात हे धंदे चालतात, मग पोलिसांना दिसत नाही का?”

स्थानिकांचा इशारा आहे की, जर हे धंदे तातडीने बंद केले नाहीत, तर भविष्यात गावात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. उरुळी कांचनसारखे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेले गाव “अवैध धंद्यांचे अड्डे” म्हणून बदनाम होईल.

पोलिस निरीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष

उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सध्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील साहेब यांची भूमिका काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांचे लक्ष आता त्यांच्याकडे आहे. मात्र, त्यांनी तातडीने धडक कारवाई करून गावातून अवैध धंदे हद्दपार केले नाहीत, तर नागरिकांकडून मोठा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, अशी चर्चा रंगू लागली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags