शिव-भीम सैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याची नम्रता ताई कांबळे यांची मागणी; आमदार आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

पुणे/हवेली :

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवादरम्यान उत्साहाच्या ओघात व काही तांत्रिक कारणास्तव शिवसैनिक आणि भीम सैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांना ‘विशेष बाब’ म्हणून तत्काळ मागे घ्यावे, अशी आग्रही मागणी हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा नम्रता ताई प्रशांत कांबळे यांनी केली आहे.

यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सन्माननीय आमदार माऊली आबा कटके, तालुकाध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, वैशाली ताई नागवडे, मोनिका ताई हरगुडे, लोचन ताई शिवले (माजी सरपंच, तुळापूर) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नम्रता ताई कांबळे म्हणाल्या की, “शिवजयंती आणि भीमजयंती उत्सव साजरे करताना अनेक तरुण कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल झाले आहेत. या तरुणांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र या प्रलंबित गुन्ह्यांमुळे त्यांच्या भवितव्यावर तसेच सरकारी नोकरीच्या संधींवर परिणाम होत आहे. शासनाने यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्याच धर्तीवर हे गुन्हे तातडीने मागे घेऊन कार्यकर्त्यांना न्याय द्यावा.”

उपस्थित आमदारांनीही या मागणीस समर्थन दर्शवत, कार्यकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आश्वासन दिले. या निवेदनामुळे हवेली तालुका आणि पुणे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags