फुगेवाडी दुर्घटनेनंतर अवैध धंद्यांवर प्रश्नचिन्ह; नागरिकांकडून पोलिस प्रशासनाला जाब

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

उरुळी कांचन : पुणे शहरातील फुगेवाडी येथे विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले असून विविध ठिकाणी अवैध हातभट्टी व दारू व्यवसायांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच का होते, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील सोरतापवाडी, भवरापूर, उरुळी कांचनतसेच परिसरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. विशेषतः हातभट्टी दारू तयार करून ती पुणे शहरात पोहोचवणारे मोठे रॅकेट खुलेआम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

स्थानिकांच्या मते, या अवैध व्यवसायांची माहिती संबंधित पोलीस यंत्रणेला पूर्णपणे असूनही कायमस्वरूपी कठोर कारवाई होत नसल्याने हे धंदे वाढत चालले आहेत. “जेव्हा मोठी दुर्घटना घडते, लोकांचा जीव जातो किंवा एखादा गंभीर प्रकार समोर येतो, तेव्हाच प्रशासन हालचाल करते. मग सामान्य नागरिकांचे जीव गेल्यानंतरच कारवाई का?” असा प्रश्न सामाजिक संघटना व नागरिक विचारत आहेत.

फुगेवाडीतील १५ जणांचा मृत्यू ही अत्यंत गंभीर आणि वेदनादायी घटना असताना, ही परिस्थिती टाळण्यासाठी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई का करण्यात आली नाही, याचे उत्तर पोलिस प्रशासनाने द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांकडून अवैध हातभट्टी व दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि या धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, फुगेवाडीसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता सातत्यपूर्ण आणि प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags