अवैध वाहतुकीविरोधात लहुजी शक्ती सेनेचा पुण्यात धडक मोर्चा.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा 

पुणे | प्रतिनिधी :

उरुळी कांचन परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला प्रशासनाकडून मिळत असलेल्या कथित संरक्षणाविरोधात लहुजी शक्ती सेना संघटनेने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र निषेध नोंदवला.

उरुळी कांचन येथील काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी गैरवर्तन, अरेरावीची भाषा तसेच एका रिक्षामध्ये तब्बल ९ ते १० प्रवासी कोंबून जीवाशी खेळ केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. या संदर्भात १५ जुलै २०२५ रोजी पुराव्यासह पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार देण्यात आली होती.

मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत माहिती मागविण्यात आली. संबंधित विभागाकडून २९ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत अवैध वाहतुकीवर कोणतीही दंडात्मक कारवाई झाल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यानंतर ८ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा अहवाल मागविला असता, केवळ अधिकाऱ्यांची बाजू मांडणारा अहवाल देण्यात आल्याने चौकशीवर संशय व्यक्त करण्यात आला. सर्व पुरावे उपलब्ध असतानाही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, घटनेचा व्हिडिओ समोर असूनही आणि तब्बल ९ महिने उलटूनही कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी DCP वाहतूक कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून, ते दप्तरी जमा केल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आंदोलनादरम्यान आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त विवेक मासाळ यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारत ८ दिवसांत चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच हडपसर ते उरुळी कांचन मार्गावरील बंद सिग्नल सुरू करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

🎯 आंदोलकांच्या प्रमुख मागण्या :

संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांना बडतर्फ करणे

अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करणे

९ महिन्यांपासून प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा

लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष विजय विठ्ठल सकट यांनी सांगितले की,

“कारवाई न झाल्यास येत्या काळात अधिक तीव्र आणि संविधानिक मार्गाने आंदोलन छेडले जाईल.”

या मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags